My Work Portfolio
टायगर मॅरेथॉन २०१९
गेले ३ महिने वाट बघत असलेला दिवस अखेर २ जून रोजी उगवला. प्रचंड अपेक्षा, आकांक्षा व कुतूहल घेऊन २ तारखेच्या दुपारी, मुंबई – जबलपूर गरीबरथा वर स्वार होवून मुंबई सोडली.
या टायगर मॅरेथॉन करिता, श्री. अजय गुप्ता या कॅनॉन डीलर असलेल्या मित्राने फोन केला व उत्सुकता चाळवली. दोन राज्यातील ४ जंगले. लगेचच हो म्हंटल. बाकीच्या मित्रांना विचारलं. सगळेच हो म्हणाले. मी, श्री. रविंद्र कशाळीकर, राजीव तायशेटे, स्वप्निल
किरकिरे व
उर्वरित ओळखी-अनोळखीचे ८ जण असे एकंदर १२ जण निघालो.
३ तारखेच्या सकाळी ६ वाजता, मुंबईच्या साधारण ३२o तापमानातून सुमारे ४२o तापमानात जबलपूरला उतरलो व पुढे असणाऱ्या परीक्षेची चुणूक मिळाली. १७२ कि.मी. अन्तरावर असलेल्या बांधवगढ टायगर रिझर्व कडे निघालो. साधारण १२:३०च्या दरम्यान बांधवगढ टायगर रिझर्व ला पोहोचलो.
दि. ०३/०६/२०१९ सफारी १ :- बांधवगढ
दुपारी ३ वाजता, ४३o तापमानाला तोंड देण्याच्या सर्व तयारीने ४ वाजताच्या सफारी करिता, “मगधी गेट” ने ४-४ च्या ग्रुप ने ३ खुल्या जिप्सी मधून निघालो. साधारण १ तासाच्या शोधाशोधी नंतर वाघ नाही पण त्यांच्या मावशीचे दर्शन घडले. हे रान मांजर खूपच कमी दर्शन देते. पुढे जंगली डुक्कर (Wild Bore), Crested Eagle, Paradise Fly Catcher (स्वर्गीय नर्तक), सांबर, हरीण, गवा इत्यांदीचे फोटो काढत, वाघाचा माग काढत राहिलो.
…आणि वाघ्र महाशयांचे दर्शन घडले. ”भामेरा” या वाघाचा, सुमारे १ वर्षाचा बछडा दृष्टीक्षेपास पडला. तो लहान असल्याने त्याचे नामकरण झालेले नाही म्हणून तो T-37 असा ओळखला जातो. उर्वरित ६.३० पर्यंतचा वेळ मोर, ई. फोटो काढत काढला.
दि. ०४/०६/२०१९ सफारी-२ :- बांधवगढ
पहाटे ४ वा. तयार होवून ५ वा. पुन्हा मागधी गेट मधून सफारी सुरुवात केली. सुमारे दीड तासाच्या भटकंती नंतर, “महामन” या सुमारे ७ वर्षाच्या नर वाघाने दर्शन दिले. गवता मुळे कॅमेरा नीट फोकस करू शकला नाही. (मला DPR तंत्रज्ञान का आठवले नाही?)
त्या नंतरचा वेळ शोधाशोध करण्यात गेला
.दि.०४/०६/२०१९ सफारी-३ :-बांधवगढ
सकाळच्या कमी वाघ्र दर्शनाने हिरमोड होवून हि, नव्या आशेने दुपारच्या सफारी करीत, ‘तला’ गेट कडे प्रस्थान केले. साधारण ४५ मिनिटातच कोल्ह्याच्या जोडीचे दर्शन झाले. हा शुभशकुन मानून, पुढे उत्साहाने निघालो.
एके ठिकाणी गर्दी दिसल्याने थांबलो व एका खूपच प्रगत कॅमेराने शुटींग चालू असल्याचे दिसले. चौकशी करिता कळले कि, डिस्ने टी.वी. वाले, “सोलो” वाघिण व तिच्या चार बछड्यांचे चित्रीकरण करीत होते.
तिथे २ तास कसे गेले कळलेच नाही.
इथून निघून, जाता जाता जवळच असलेल्या व ज्या चरणगंगा नदी मुळे, तला (तलाव) जंगल हे नाव पडलेल्या नदीचे उगम स्थाना पर्यंत सहल करण्या साठी गेलो. तिथे जुन्या लेण्या व शेषनागावर निद्रिस्थ भगवान विष्णु व तिथून वाहणारी चरण गंगा नदीचे दर्शन झाले.
निघण्याची वेळ झाली म्हणून नाईलाजाने निघालो. साधारण संध्याकाळी ५:४५ वाजता चक्रधराचा १८ महिन्यांचा नर बछडा, जो दुपारी आराम करायला गेला होता तो, दृष्टीक्षेपात पडला. बहुतेक दुपारी आराम करून भूख लागली असावी, किंवा एक प्रयत्न म्हणून, तेथे चरत असणार्या हरिणावर charge केला. हरीणं तर पळाली. हा मात्र, काहीच झालं नाही असं दर्शवून येवून बसला.
दि. ०५/०६/२०१९ सफारी-४ :- बांधवगढ
कालच्याच ठिकाणी जायला निघालो आहोत. रस्त्यात पुन्हा डिस्नेची कॅमेरा जीप दिसते. आम्ही खुश झालो. वाट बघत बसलो. साधारण २ तासांच्या प्रतीक्षे नंतर व पोट भरल्या नंतर बाईसाहेब तोंड पुसत बाहेर आल्या व आपल्या बछड्या कडे निघाल्या, आमच्या कडे तुच्छतेने पहात.
बांधवगढला दर बुधवारी दुपारची सफारी नसते. त्या मुळे, आम्ही आमच्या पुढील स्थानकाकडे म्हणजे, एका सुंदर जंगला कडे अर्थात कान्हा कडे निघालो. २१८ कि.मी.चे अंतर कापून संध्याकाळी ७ वा. कान्हाच्या जीनेक्स्ट रिसॉर्ट येथे पोहोचलो.
दि. ०६/०६/२०१९ सफारी-५ :- कान्हा
कान्हाच सुंदर जंगल. गेट ने जंगल सफारी सुरु सकाळीच झाली, तीही बफर एरियात. थोडं मन खट्टू झालं. पण अचानकच ढोल किंवा जंगली कुत्र्यांचा कळप समोर आला. यालाच चमत्कार समझुन सगळ्यांनी आप-आपली हत्यारे सिद्ध केली व नेम धरला. हा खूपच अभावाने दिसणारा प्राणी आहे.
दि. ०६/०६/२०१९ सफारी-६ :- कान्हा
दुपारच्या सफारी साठी, कान्हाच्या गेट मधून कोअर मध्ये जाताना वाटेत बाराशिंगा, कोल्हा, गवे, हरणं, अस्वलं बघत वाघाचा माग काढणे चालू होते. फक्त १० वेळा कॅमेरा वापरला गेला. दूर दाट जंगलात वाघ्र नर मादीचे दर्शन झाले, पण मला काही दिसले नाहीत. लाईट खूपच कमी होता, व ती जोडी, आम्ही पोहचे पर्यंत आत निघून गेली होती. माझ्या मित्रांना काही फोटो मिळाले. गाईड च्या सांगण्या नुसार ती “नैना” होती व अनोळखी नर वाघ होता. ते मधुचंद्रात असल्याने, सुमार आठवडा दोन आठवडे एकत्र रहाणार होती.
आमच्या दुसऱ्या टीमला खूपच सुंदर फोटो मिळाला. अजय व टीम आम्ही जिथून पुढे नैनाला बघयला गेलो, ते तिथेच थांबले होते. त्यांना सब्र का मिठा फल मिल गया. ज्या पाईप ड्रेन पार करून आम्ही आलो, त्याच पाईप ड्रेन मध्ये चार्जर व मादी मधुचंद्रात मस्त होती. व एक माकड त्यांना वाकून बघत होता. वाघाला राग आला व तो रागाने डरकाळ्या फोडत बाहेर आला व त्याने माकडाला पकडायला झेप घेतली. माकड तर पळून गेले पण श्री. योगेश दिवेकर व श्री. अजय गुप्तांनी ती झेप त्यांच्या कॅमेरात बंद केली. सोबत असुन ही, श्री. स्वप्निल किरकिरे यांना ती झेप कॅमेराबद्ध करता आली नही. Bad Luck!
आज पुन्हा कान्हा गेट. ग्रेट! नेहमी प्रमाणे उत्साहाने निघालो. वातावरण मस्त आहे. आर्ध्या तासातच सूर्योदय झाला. कान्हा जंगलातील, कान्हा झोन, मस्तच.
लगेचच आमच्या शुभ शकुनी कोल्ह्यानी समोरून, अगदी Head On दर्शन दिले. सुरुवात तर फारच चांगली झाली. समोर दोन नर Spoted Dear ची फाईट चालू होती. आणि आम्ही फोटो काढत होतो. जंगलातील पाळीव हत्ती मस्त आपल्या पिल्ला सोबत मड बाथचा आनंद घेत होते.
गवे आपल्या कुटुंबासोबत गवत खात रवंथ करत होते. त्यांना भीती नव्हती पण त्यांच्या बच्च्ड्यावर बारीक लक्ष होते. परत सोनेरी कोल्ह्याने दर्शन दिले. पुढे छोटे अस्वल महाशय एकटेच फिरत होते. त्याची आई जवळच असयला हवी होती पण दिसली नाही.
वाघोबाची शोधाशोध चालूच होती. गाईड व चालकाला आमिषे देवून झाली होतीच. ते दोघेही प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते. अचानक एका विशिष्ठ दिशेने वाहनांची धावपळ सुरु होते. वाट बघायची, हिरमुसले होवूं पुढे जायचं. असं सतत चालू होत. पाळीव हत्तीवर स्वार होवून निघलेल्या महुतानी एक टीप दिली. आम्ही आशेने पुढे निघालो व गाईड ने अंदाज घेवून एके ठिकाणी जिप्सी थांबवली. अंदाज खरा निघाला. दूर जंगलात अनोळखी वाघ दिसला. आम्ही त्याची पुढे येण्याची वाट बघत थांबलो. सुमारे आर्ध्या-पाऊण तासाच्या प्रतिक्षे नंतर साहेब हळूहळू अंदाज घेत बाहेर आले. पुढे गवताचे मैदान होते. आर्धे मैदान शांतपणे पार केल्या नंतर, अचानक त्याला काय झाले कुणाच ठाऊक? तो डरकाळ्या फोडत. लांब लांब उड्या मारीत धावू लागला. आमच्या ग्रुप मधील श्री. हेमंत सावंत यांच्या जिप्सी समोरून उड्या घेत पुढे गेला.
श्री. सावंत यांनी सांगितल्या नुसार, ते इतके आश्चर्यचकित झाले कि, कॅमेरा उचलायचे पण भान त्यांना नव्हते.
हाच तो रागिष्ठ “छोटा चार्जर”. नावाप्रमाणे fully
Charged.
पुढे तो परत दिसेल म्हणून, त्यांच्या गेलेल्या दिशेच्या अनुरोधाने आम्ही वाट बघत थांबलो. समोरून श्री. अजय गुप्ता व टीमची जिप्सी आली. ‘तुम्हाला काय मिळालं.?’ ‘आम्हाला काय मिळालं!’ विचारांची देवाणघेवाण झाली व वाट बघत थांबलो. साधरण पाऊण ते सव्वा तास वाट बघितल्या नंतर, अचानक आमच्या जिप्सी मधून श्री. तायशेटे साहेबांचा आवाज आला. ‘अरे तो बघ!’ आम्ही सर्व उत्तेजित तर होतोच. पण.... तिथून एक हरण गेलं. थोडी खसखस पीकली, पण मजा आली. थोडाच वेळ वाट बघावी लागली. आणि तो आला....
दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या जीप्सिंच्या रांगा मधून तो आम्हां कडे न बघता सरळ, माझ्या समोरून राजा सारखा निघून गेला.
आता चर्चा हि होती कि, तो कोण होता? मग मागील फोटो बघितले गेले, जुन्या नव्या फोटोंची उजळणी झाली. मग निष्कर्ष निघाला कि, हा “छोटा चार्जर” नाही. मग कोण. गाईड, चालकाची चर्चा झाली व महाशयांच नाव कळाले. “बलवान”, “नीलिमा” या वाघिणीचा सुमारे ४ वर्षाचा छावा.
येताना, एक विचित्र रंगाचा माकड दिसून आला. या माकडात, मनुष्य प्राण्यात आढळणारा Albinism अर्थात त्वचेतील रंगद्रव्याची कमतरता असणे या रोगाची लागण झालेली दिसून आली.
Centre Point कडे न्याहारी करिता जाताना, वाटेत राजबिंड्या बाराशिंगाचां कळप दिसला. या प्राण्याचं नामशेष होण्याच्या मार्गावरचा प्रवास थांबून, कान्हा जंगल कर्मचारीवर्ग यांच्या प्रयत्नाने त्यांची संख्या जवळपास १००० पर्यंत गेल्याचे गाईडने सांगितले. या राजबिंड्या प्राण्याचे फोटो न काढणे हो मोठा गुन्हा ठरू शकतो.
आज परत पुढच्या जंगलाला जायचं असल्याने, रिसॉर्ट वर आलो. जेवण बांधून तयार होतं. कपडे बदलले व गाडीत बसलो. १८५ कि.मी. दूर पेंच चे जंगल खुणावत होतं. हे तिसरे जंगल. कान्हाच्या सुखद आठवणी मनात घोळवत पुढे निघालो,
दि. ०७/०६/२०१९ सफारी-८:- पेंच जंगल (मध्य प्रदेश)
दुपारी साधारण २ वा. पेंच च्या टूराई गेट पासून फक्त ५० मी. दूर असलेल्या मोनू पांडेच्या पेंच टायगर रिसॉर्टला पोहचली. उतरता उतरता वरुणराजाने वाजंत्री वाजवायला सुरुवात केली होतीच. सफारीची तयारी करीत असतानाच, आला आला वारा, संगे पावसाच्या धारा या गाण्याची आठवण करून देणारा वळवाचा पावूस आला. सकाळच्या आनंदावर पाणी फिरवणार असे वाटतच असतानाच पावूस थांबला. निघालो, पण दूर जंगलात पावूस पडत असल्याचे मनोहारी दृश्य दिसत होते. मस्त मृदगंध पसरला होता. त्याचा आस्वाद घेत, टूरिया गेट मधून आत गेलो.
सिताघाटच्या दिशेने निघालो. वाटेत Spotted Dear (Male), Jackal, Indian Roller, Serpent Eagle, रान कुत्रा, ब्राम्हणी मैना, वैगरेंचे फोटो काढत पुढे मार्गक्रमण करीत असताना एके ठिकाणी सफारी जिप्सी थांबलेल्या दिसल्या. कॉलरवाली हि वाघिण आपल्या बछड्यां सोबत असल्याच कळले. जवळपास दोन तास वाट बघून, निघूया असा विचार केला तर. श्री. तायशेटे साहेबांनी नदी पर्यंत जावून यायचा आग्रह केला. म्हणून पुढे गेलो. गाईड दुर्बिणीतून बघू ओरडला, TIGER! सर्वाच्या लेन्सेस तिकडे वळल्या. प्रचंड दूर असल्यामुळे माझ्या Cannon EF 100-400 च्या रेंज मध्ये हि येत नव्हती. शेवटी अंदाजाने फोटो काढले व कॅमेरा स्क्रीन वर zoom करून बघितले तर काय? ज्या कॉलरवाली ला शोधात होतो ती अगोदर पाण्यात डुंबत होती. जसा तिचा boy friend आला, या boy friend चे नाव नंतर “टारझन” असे कळले, ती त्याला घेऊन आपल्या बछड्यां पासून दूर घेऊन गेली. बहुतेक वेळी नर, मादीला सहवासा साठी, तिच्या सोबत असलेल्या बछड्यांना मारतो.
दि. ०८/०६/२०१९ सफारी- ९ :- पेंच जंगल (महाराष्ट्र)
नाईट जार जो पहिल्यांदाच झाडावर दिसल, जे मिळेल त्याचा फोटो घेत फिरत होतो. सोबत Serpant
Eagle वैगरेंचे फोटो घेत वेळ काढला. खूप दूरवर “बाकरी” वाघिण दिसली. नजरेनेच फोटो काढले व खट्टू होवून रिसॉर्ट वर परत आलो.
दि. ०८/०६/२०१९ सफारी- १० :- पेंच जंगल (महाराष्ट्र)
पुन्हा खूर्सापार गेट. कालची सफारी फुकट गेल्याचे दु:ख्ख होतेच. टूराई गेट कडून आशा होती. वाटेत, सुमारे ७ ते ८ पिल्लांना घेऊन पळणारी डुकरीण दिसली. ती पळण्याच कारण तिच्या मागेच होत. एक कोल्हा तिच्या मागे एखाद पिल्लाला उचलायला मिळेल या आशेने पळत होता. पुढे काय झालं ते कळले नाही.
पुढे जाताना Serpent
Eagle बसलेला दिसला. अगेन्स्ट लाईट होता.
हि पण सफर वाया गेली.
दि. ०९/०६/२०१९ सफारी- ११ :- पेंच जंगल (महाराष्ट्र)
आज सकाळी पुन्हा खुर्सापार, प्रयत्न केला, टूरिया गेट मिळण्या साठी, पण रविवार असल्याने शक्य झाले नाही. म्हंटले, आलीया भोगासी....
जाताना दोन घुबडांची पिल्ले टकमक टकमक बघत होती. आज पुन्हा वेडावून तर दाखवत नसतील! जमतील तसे खूपच कमी लाईट मध्ये फोटो काढले व गेट कडे निघालो.
“बाकरी’ चा शोध घेता घेता, मिळेल ते शूट करीत होतो उदा. सांबर, काळ्या तोंडाची वानर, Collared Dove, वैगरे, वैगरे. पुन्हा निराश मनाने कंटाळून लवकरच रिसॉर्ट वर आलो.
दि. ०९/०६/२०१९ सफारी- १२ :- पेंच जंगल (मध्य प्रदेश)
आज दुपारी टूरिया गेट मधून जायचं असल्याने आनंदात होतो. मागील तीन सफारी पूर्णपणे वाया गेलेल्या. सुरुवातीलाच Crusted Eagle ने दर्शन दिले. एके ठिकाणी गर्दी आढळली म्हणून थांबलो. चौकशी करता कळले कि, “लंगडी” नावाची वाघिण पाणी पिऊन आराम करत होती. वाट बघितली. तिची बाहेर यायची काही इच्छा दिसत नव्हती. व पुढे सीताघाटला निघालो. पुन्हा हाती निराशा पडली. हताश होवून परत निघालो.
दि. १०/०६/२०१९ सफारी- १३ :- पेंच जंगल (मध्य प्रदेश)
खरे तर आज सकाळची सफारी खुर्सापार ला होती. आम्ही ११ पर्यंत परत येवून दुपारी जेवून रात्री ९:१५ वाजताच विमान नागपूरला पकडायचा कार्यक्रम होता. परंतु विमान सुमारे एक तास लेट (नेहमी प्रमाणे)असल्याचा मेसेज मिळाल्याने, दुपारची एखादी सफारी करावी याचा प्लान सुरु झाला व अमलात आणला गेला.
आणखी एक बदल केला गेला. जो आज आम्हाला असणारी, खुर्सापार गेटची सफारी ऐवजी टूरिया गेट ची सफारी आयोजित केली. त्या प्रमाणे आम्ही टूरिया गेटच्या दिशेने वळलो सुरुवातीलाच, कोल्ह्यानी दर्शन देवून सुरुवात तर चांगली झाली. साधारण एक तासातच देवानी आमची मागणी पूर्ण केली. लेपर्ड किंवा बिबट्या या मुलखाच्या लाजाळू प्राण्याने दर्शन दिले. श्री. कशाळीकर यांना लाख लाख धन्यवाद द्यायला हवेत. त्यांनी जर लेपर्डला बघितलं नसत तर?
काय Action मिळाली म्हणून आनंदात गेटच्या बाहेर पडलो. या सफारीचा व या वर्षीच्या सिझनचा राम राम करून बाहेर पडलो.
आमच्या ग्रुप लीडर श्री. अजय यांनी विमानाच्या सुमारे १ तासा ऐवजी, ३ तास जास्त मिळालेल्या वेळेचा सदउपयोग करण्याच्या दृष्टीने, पेंच पासून ४८ कि.मी. अंतरावर असलेल्या “मानसिंगदेव राष्ट्रीय उद्यान” या चोरबाहुली गावातील, नागपूर रस्त्या वरील जंगल सफारीचा बेत आखला होता. त्या प्रमाणे मोनू पांडेच्या, पेंच टायगर रिसॉर्ट या टूराई गेट पासून फक्त ५० मीटर वर असलेया रिसॉर्ट मधून ३ रात्रीच्या रहिवास नंतर निघालो.
या रिसॉर्टची सर्वांत सुंदर सोय म्हणजे, अप्रतिम जेवण, सकाळच्या सफरीत व्यवस्थित बांधून देणारा पौष्टीक नाश्ता, अप्रतिम शाकाहारी दुपारचं जेवण, संध्याकाळी थकून आल्या नंतर गरमागरम चहासोबत मिळणारे भजी, ब्रेड पकोडे, वैगरे व रात्री शाकाहारी/मांसाहारी जेवण. मोनू स्वतः फोटोग्राफर असल्याने, त्याने सर्व रूम मध्ये योग्यत्या सोई, उदा. कॅमेरा बॅरीज् चार्ज करण्या साठी भरपूर इलेक्ट्रिक पॉईन्टस् केले आहेत. कारण सर्वच फोटोग्राफर असल्याने मी आगोदर कि तू, यात वाद होऊ शकतात.
दि. १०/०६/२०१९ सफारी- १४ :- मानसिंगदेव राष्ट्रीय अभयारण्य, चोरबाहुली (महाराष्ट्र)
आता मला दगदगीचा त्रास जाणवायला लागला होता. आमच्या पूर्ण ग्रुप सुस्थितीत होता. चोरबाहुली कडे जाताना मला, ओकारी झाली. ड्राईव्हर नुसार हा उन्हाचा त्रास होता. मानसिंगदेव राष्ट्रीय अभयारण्यात आम्ही बरोबर ३ वाजता प्रवेश केला व पावूस आला. आम्ही कॅमेराला वाचवत होतो तिकडे ड्राईव्हर छप्पर चढवत होता. थोड्या वेळातच पावूस थांबला.
बरेच फिरल्या नंतर, “लक्ष्मी” या वाघिणीचा माग लागला. तिने काही तोंड दाखविले नाही. पाठीचे पोटाचे फोटो काढत राहिलो.
एकंदर २ राज्ये, ५ जंगले, १४ सफारी, ६२३ कि.मी. प्रवास करून १४ वाघ, १ लेपर्ड, अनेक श्वानकुलोत्पन्न प्राणी, पक्षी, वैगरे बघून शांत झालेली मने व कॅमेरे, पुढचा कार्यक्रम काय असेल, याच विचारात घरी आलो व झोपून गेलो.
-: प्रदीप उंबरकर, कल्याण.
https://pradeepumbarkar.myportfolio.com